नगर:
राहुरी न्यायालयात वकिली करणारे मानोरी येथील ऍड.राजाराम जयवंत आढाव(वय 52) आणि ऍड.मनीषा राजाराम आढाव(वय 42) या वकील दांपत्याच्या खंडणी साठी झालेल्या निर्घृण हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे. आरोपींनी अपहरणाचा बनाव उभा केला होता. खंडणीचा कट रचणारा किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून मुख्य आरोपी असून त्याचे वकीलपत्र हत्या केलेल्या वकील आढाव दांपत्याकडेच होते. मुख्य आरोपी दुशिंग याच्यावर खून,खंडणी, घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे राहुरी, संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल आहेत, थोडे-नी थिडके 12 गुन्हे दुशिंगच्या विरोधात दाखल आहेत. या दुहेरी हत्येच्या गुन्ह्यात एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले असून यातील इतर काही आरोपींवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनीच सांगितले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरी पोलिसांनी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने तातडीने पाऊले उचललत पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी हुशारीने तसेच तांत्रिक अभ्यास करून आरोपींना तात्काळ अटक केल्याने ही जमेची बाजू असली तरी मुळात गंभीर गुन्ह्यातील आरोपी जामीन आदी कारणांनी तुरुंगा बाहेर असताना पोलिसांची अशा गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर असणे गरजेचे असल्याचे पुढे आले आहे. त्यातून अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच पोलिसांना त्याचा सुगावा लागला तर निरपराध नागरिकांचे जीव वाचवण्यास मदत मिळणार असते. राहुरीच्या आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी रेकॉर्डवरील नामचीन गुन्हेगार असल्याचे पुढे आलेले असताना या घटनेच्या निमित्ताने जिल्ह्यात राबवली गेलेली “टू प्लस” आणि “गुन्हेगार दत्तक योजने”चे सध्या काय सुरू आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिक आहे.
डॉ.प्रताप दिघावकर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना त्यांनी 2020 ला “गुन्हेगार दत्तक योजना” सुरू केली होती, तर पुढे मनोज पाटील अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी जुलै 2021 मध्ये “टू प्लस” योजना राबवली होती.
डॉ.दिघावकर यांच्या योजनेतील संकल्पेनुसार
गत सात वर्षांत दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, खंडणीचे गुन्हे, दिवसा व रात्री घरफोडी, सर्व प्रकारच्या चोऱ्या, अग्नीशस्त्रांबाबतच्या गुन्ह्यांमधील आरोपींवर गुन्हेगार दत्तक योजनेंतर्गत लक्ष ठेवण्यात येणार होते. त्यांच्या हालचालींची माहिती आपल्या घटक प्रमुखांना प्रत्येक 15 दिवसांनी कळविणे अनिवार्य होते. या योजनेमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल या अपेक्षेने महानिरीक्षक दिघावकर यांनी गुन्हेगार दत्तक योजना अंमलात आणली होती.
याच धर्तीवर मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक असताना “टू प्लस” योजना सुरू केली होती. यात दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपी गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्या हालचाली काय सुरू आहेत या माध्यमातून संभाव्य गुन्हे रोखण्यास चालना दिली होती.
या दोन्ही योजनांचा उद्देश रेकॉर्डवर आलेल्या आरोपी-गुन्हेगारांवर थेट पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्या हालचाली नोंदवल्यास गुन्हेगारांवर अपोआप जरब बसणार होती. आपल्यावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे हे लक्षात असल्याने नव्याने गुन्हे करण्यास ते प्रवृत्त होण्यास धजावत नसत. त्याच बरोबर जर असे गुन्हेगार नव्याने काही गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत का याबाबत पोलिसांना अगोदरच कल्पना येऊ शकत असल्याने अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच पोलीस अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकत होते.
समाजात काही लोकांत गुन्हेगारी ही एक प्रवृत्ती बनून ती पूर्णपणे थांबवू शकत नसलो तरी त्यावर विविध उपाययोजना करून बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध आणू शकतो हे शक्य आहे. अशा उपाययोजना करणे ही पोलिसांची जबाबदारी असली तरी एक नागरिक म्हणून समाजातील सामान्य आयुष्य जगणाऱ्या नागरिकांचीही ती जबाबदारी आहेच. अनेक गुन्हे घडण्यापूर्वी आरोपी संगनमताने कट रचत असतात. असे कट काही एका दिवसात तयार होत नसतात तसेच कटाची अंमलबजावणी होण्यापूर्वी सराईत गुन्हेगार रेकी करत असतात. अशा वेळी गुन्हेगारांच्या संशयित हालचाली या पोलिसांच्या नजरेत असणे तसेच सामान्य नागरिकांच्या लक्षात आल्यास तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे असते.
वकील आढाव दांपत्याच्या हत्येच्या या एका घटनेत पाहिले तरी आरोपीं रेकॉर्डवरील आरोपी आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना आरोपीं कडून मिळालेल्या माहितीतून घटनाक्रम पाहिल्यास नियोजित कट करून संगनमताने हा गुन्हा घडला आहे. हत्या झालेले वकील दांपत्य अनेक तास आरोपींच्या ताब्यात होते. या काळात त्यांची निर्घृण हत्या होई पर्यंत कुणालाही याची कल्पना यावी नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी निश्चितच तातडीने पावले उचलत गुन्ह्याची उकल करत आरोपींना जेरबंद केले आहे. मात्र एकूणच अनेक गुन्ह्यात वारंवार जे आरोपी समोर येतात. ज्याला पोलीस दरबारी हिस्ट्री शिटर अशी ओळख आहे. त्यांच्यावर “पोलिसी नजर” असणे ही आवश्यक बाब आहे. त्यादृष्टीने यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या विविध योजनांची सध्या काय परस्थिती आहे? त्या सुरू आहेत की अधिकारी पदावरून गेले आणि योजना बासनात गुंडळल्या गेल्यात का? तसे असेल तर नव्याने आढावा घेऊन अशा योजना गुन्हेगारांची नव्याने माहिती संकलित करून त्यावर काम करणे आवश्यक बनले आहे असे वकील आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्येच्या निमित्ताने म्हणावे लागेल. काळ सोकावू नये अशीच सर्वसामान्य नागरिकांची पोलीस खात्याकडून अशी अपेक्षा असणार आहे.