रुईछत्तिशी येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन..
नगर:
लोकसभा निवडणुका तोंडावर असल्या तरी त्यानंतर काही महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता आजी-माजी लोकप्रतिनिधी, नवे इच्छुक तयारीला लागले आहेत. यात सध्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त राजकीय हालचाली आतापासूनच सुरू झालेल्या दिसून येत आहेत. यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे अनेक कारभारी स्वतः निवडणुकीत उतरण्याऐवजी आपल्या कारभारणीला निवडणुकीत उतरवरणार अशीच परस्थिती आहे. यात प्रतिभा पाचपुते, अनुराधा नागवडे आणि डॉ.प्रणोती जगताप यांचे नाव एव्हाना चर्चेत आलेले आहे. अनुराधा नागवडे यांच्या नंतर आता डॉ.प्रणोती जगताप यांनी आपण येणारी विधानसभा निवडणुकीत असणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रुईछत्तिशी ता.नगर येथे माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी सौ.डॉ.प्रणोती जगताप यांनी हळदी – कुंकू कार्यक्रम आयोजित करून आगामी श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघ सध्या अनेक कार्यक्रमांनी चर्चेत आला आहे. त्यात आता माजी आमदार राहुल जगताप यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
हळदी – कुंकू कार्यक्रम आयोजित करून त्यांनी शेकडो महिलांशी संवाद साधला. आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असून सर्वांनी सहकार्य करावे. मतदारसंघातून महिलांच्या समस्या मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. रुईछत्तिशी गावातील मतदारांनी 2014 साली विक्रमी मतदान करून राहुल जगताप यांच्यावर विश्वास दाखवला होता.राहुल जगताप यांनी प्रतिनिधीत्व करताना गावातील अनेक समस्या मार्गी लावून विकासकामे केली याची देखील त्यांनी आठवण करून दिली.
कार्यक्रम वेळी सरपंच विलास लोखंडे , उपसरपंच आशाबाई वाळके , माजी उपसरपंच प्राजक्ता भांबरे , माजी चेअरमन एकनाथ गोरे , माजी संचालक रोहिदास जगदाळे , माजी उपसरपंच बाळासाहेब खाकाळ , सागर गोरे , विलास भांबरे , संदीप गोरे , नवनाथ जगदाळे , विकी लोखंडे तसेच गावातील सर्व माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.