निळवंडे कामात कोणतेही योगदान नसणाऱ्यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये – कानवडे
ज्यांना कालवे कामे याबाबत काही माहिती नाही ते प्रसिद्धीसाठी खटाटोप करतात
संगमनेर( प्रतिनिधी ):
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण झाला. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेसह महाराष्ट्राने त्यांना जलनायक पदवी दिली. याउलट निळवंडे धरण कालवे यामध्ये कोणतेही योगदान नसणारे उलट या कामांना विरोध करणारे आज मात्र श्रेय घेऊ पाहत आहे त्यांचा हा प्रसिद्धीसाठी केविलवाना खटाटोप असल्याची घाणाघाती टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केली आहे.
निमज, झोळे गणेशवाडी जाखुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते जननायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे,सौ.दुर्गाताई तांबे,सुधाकर जोशी, सरपंच अरुण गुंजाळ, विलास कवडे, दत्तू कोकणे, सुरेश थोरात सागर डोंगरे यांचे सह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कानवडे म्हणाले की, निळवंडे धरण आणि कालवे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. हे तालुक्यातील लहान मुलापासून वृद्धांपर्यंत माहिती आहे. ज्यांनी आमदारकी, मंत्रीपद या कामासाठी पनाला लावले. ते आमदार थोरात जलनायक आहेत. मात्र निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाला ज्यांनी विरोध केला. ते लोक आज श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत.
संगमनेर तालुक्यातील काही खबरे पाणी पूजन करत फिरत आहेत .यांचे या कामात योगदान काय हे पहिले त्यांनी जनतेला सांगावे. ज्यांना कालवा आणि धरण सुद्धा माहीत नाही. ते आता मोठमोठ्या बातम्या देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप करत आहेत . मात्र त्यांच्या या भूलथापांना जनता कधीही थारा देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
तर रामहरी कातोरे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कोणतेही काम करताना कधीही प्रसिद्धी केले नाही. मात्र निळवंडे मध्ये ज्यांचे योगदान नाही ते लोक सत्तेवर आले आणि आता श्रेय घेण्याचा खाटाटोप करत आहेत. आपले योगदान काय ते पहिले सांगा असा सवाल त्यांनी केला.
अरुण गुंजाळ म्हणाले की, भाजपाचे लोक हे खोटे बोलणारे लोक आहेत. त्यांचे सर्व समर्थक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही प्रसिद्धी करताना त्यांच्या खोटेपणाचा चेहरा सर्वांना कळत असल्याची टीकाही त्यांनी केली या प्रसंगी सागर डोंगरे, यांसह विविध युवकांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली
जलनायक आमदार थोरात यांची गावोगावी जंगी मिरवणूक
म्हळादेवी येथील मोठ्या जलसेतूसह बोगद्यांची कामे मार्गी लावत आमदार बाळासाहेब थोरात यांनी उजवा कालवा पूर्ण केला. त्यांच्याच अथक प्रयत्नातून उजव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात आल्याने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावातून आमदार थोरात यांची भव्य जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक ठिकाणी पाण्याचे सुवासिनी औक्षण केले. टाळ मृदुंगाच्या गजरात गावोगावी झालेले पाण्याचे स्वागत हे अत्यंत उल्लेखनीय ठरले.


