नगर:
शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक पदाचा शिरीषबाबासाहेब वमने यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी संदीप मिटके यांनी वमने यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिरीष वमने यांची पोलीस अधिकारी सेवेतील ही पहिली पोस्टिंग असून सेवेची सुरुवात साईंच्या शिर्डीतुन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिरीष वमने परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांचे 25 जानेवारीला निघालेल्या आदेशात त्यांची नेमणूक गडचिरोली जिल्ह्यात धानोरा विभागाचे पोलिस उपअधीक्षक म्हणून करण्यात आली होती. मात्र या आदेशात शासनाकडून सुधारणा करत त्यांना शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक आदेश काढण्यात आला. त्यानुसार वमने यांनी संदीप मिटके यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
शिरीष वमने यांचे आई-वडील दोघेही शिक्षक असून पत्नी या नगर जिल्ह्यातच जामखेड इथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
दरम्यान संदीप मिटके यांची शिर्डीतून नाशिक शहर सहआयुक्त म्हणून निघालेल्या शासन बदली आदेशातही बदल करत त्यांना नगर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. मिटके आज मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. नगर शहर उपअधीक्षक पदी असताना मिटके यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. एक धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
सध्या नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा उघड होऊन यात नामांकित असलेल्या व्यक्ती आरोपीं असल्याने संदीप मिटके यांच्या कडून धडाकेबाज कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.