“साहेबां”चा फोटो असलेल्या पिवळ्या पंचाने वेधले लक्ष..
फलकावरून घड्याळ गायब, मात्र “राष्ट्रवादी” “शरद पवार” कायम!!
नगर:
काल सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील राजकारणासाठी आला आणि पुन्हा एकदा एक राजकिय भूकंप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये झाला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाचे असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर शरद पवार गटाला तातडीने 24 तासाच्या आत पक्षाचे नवीन नाव सादर करण्यास बजावले. त्यामुळेच एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक राजकीय मोठा भूकंप झाला. यातला सर्वात मोठा धक्का हा शरद पवार यांना तसेच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र याच परिस्थितीत लगेच आज दुसऱ्या बुधवारी नगर जिल्ह्यात कर्जत आणि नगर शहरात शरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावे आयोजित करण्यात आलेले होते. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज उपस्थिती देत जोरदार बॅटिंग केली. आलेला निर्णय हा जवळपास अपेक्षित होता, कारण सध्या न्याय मिळणं अवघड झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र एकूणच निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध म्हणून नेत्यांनी काळ्या रंगाच्या पट्ट्या दंडावर बांधून निषेध व्यक्त केला. महत्त्वाचा विषय म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ कुठेही दिसून आलं नाही. मात्र नगर मधील कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार आणि त्याचबरोबर शरद पवार यांचा फोटो असलेले फलक दिसून आले. गळ्यात नेहमी घड्याळ चिन्ह असलेला पंचा, जयंत पाटील यांच्यासह कोणत्याही नेत्याच्या गळ्यात नव्हता. मात्र पिवळ्या रंगाचा पंचा यावर शरद पवार यांचा फोटो होता, असा पंचा सर्वच पाहुण्यांनी गळ्यात टाकला होता.
काय म्हणाले जयंत पाटील..
-आयोगासमोर आम्ही सर्व गॊष्टी व्यवस्थित मांडल्या आहेत, त्यामुळे आमची बाजू मांडण्यात काही चूक झाली नसून चूक निकाल देणाऱ्यांकडून झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. आम्ही आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जात असून सर्वोच्च न्यायालय न्याय करेल अशी आता आशा आहे. आम्हाला वाटले होते देशात न्याय आहे, मात्र निवडणूक आयोगाच्या निकालानंतर न्याय नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे तेंव्हा आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडून आशावादी आहोत असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर मध्ये राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्या निमित्ताने जयंत पाटील नगर मध्ये आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले असले तरी याची काहीशी कल्पना आम्हांला आणि कार्यकर्त्यांना होती, त्यामुळे कार्यकर्त्यांत कसलाही संभ्रम नाही. शरद पवार जिथे उभे राहतात तिथे पक्षही उभा राहतो असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सुनावणी पूर्ण होऊन दोन महिने झाले असल्याने लोकसभा निवडणुकी पूर्वी सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल अशी आशा व्यक्त करत आमचा पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या आघाडीत ठरेल त्याप्रमाणे पूर्ण ताकतीने लढले अशी माहिती त्यांनी दिली.