नगर:
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे सर्वेतून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली असून दोन वर्षांपूर्वी पक्षात पडलेल्या उभ्या फुटी नंतर पक्ष पुन्हा एकदा सावरण्यासाठी लोकसभा निवडणूक महत्वाची आहे। ही मोठी परीक्षा उद्धव ठाकरे यांच्या समोर असल्याने जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने नगर जिल्ह्याचा विचार करता शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा 2009 पासून शिवसेनेकडे राहिला आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले आहे. मात्र शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाने शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवतानाच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी पक्षांतर्गत अंतिम केल्याचं पुढे येत आहे. त्याची पुष्टी वाकचौरे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने प्रचाराचा शुभरंभाचा भाग म्हणून उद्धव ठाकरे तब्बल दोन दिवस नगर जिल्ह्यात उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून असणार आहेत.
या संदर्भात माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख ल, संभाव्य उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिवसेनेचे नगर दक्षिण सह संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी होणारा संभाव्य दौरा “न्यूजनगरी”शी बोलताना स्पष्ट केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसांमध्ये तब्बल सहा ठिकाणी शिव जनसंवाद मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शनिशिंगणापूर मध्ये दाखल होतील, इथे ते शनी मूर्तीचे दर्शन घेतील. त्यानंतर सोनई येथील पब्लिक स्कूल येथे आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शिव जनसंवाद मेळाव्यास संबोधित करतील. हा कार्यक्रम सकाळी साडेअकरा वाजता होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता श्रीरामपूर येथे भगतसिंग चौकामध्ये शिव जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर राहाता येथे सायंकाळी साडेपाच वाजता जनसंवाद मेळावा संपन्न होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिर्डी येथे मुक्कामी असतील.
14 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव येथील आंबेडकर मैदानात शिव जनसंवाद मेळावा संपन्न होईल. त्यानंतर साडेअकरा वाजता संगमनेर येथे उद्धव ठाकरे पोहोचतील. संगमनेर येथील बस स्टॅन्ड समोर शिव जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी अकोले येथील बाजार तळावर शिव जनसंवाद संपन्न होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिर्डी येथून विमानाने मुंबईला परततील.
या मेळाव्यास मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत आदि शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.