नगर:
माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनर्सवर खा.सुजय विखे यांनी उत्तर देताना जे जे भावी म्हणून बॅनर्स लागतात ती लोकं त्या पदापर्यंत कधीच पोहचलेली नाही असा माझा राजकीय अनुभव असल्याचा टोला लगावला आहे. नगर तालुक्यातील वाळकी इथे “गाव चलो अभियान” या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
खा.विखे म्हणाले की, मधल्या काळात हे भावी अमुक-तमुकचे बॅनर्स लागण्याचे फॅड आलेले आहे. यात भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी खासदार, भावी आमदार, भावी मंत्री,मुख्यमंत्री असे बॅनर्स लागतात. मात्र ज्या ज्या लोकांच्या भावी म्हणून जाहिराती झाल्या आहेत तिथे ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाही असा माझा राजकीय अनुभव आहे. मात्र तरीही अशा भावी लोकांना माझ्या शुभेच्छा असे मार्मिक उत्तर दिले.
प्रश्न काँग्रेसच्या थोरातांबद्दलच्या “भावी मुख्यमंत्री” बॅनर्सवर विचारला असला तरी विखे यांनी उत्तर देताना भावी आमदार,खासदार असाही उल्लेख करत विरोधकांसोबतच पक्षांतर्गत व महायुतीतील इच्छुकांना टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात अनेकजण भाजपकडून इच्छुक असल्याबद्दल विचारले असता खा.विखे यांनी 2024 ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच बनवायचे आहे. त्यामुळे”गाव चलो अभियानातून” केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विविध विकासकामे, योजना आदी गोष्टी जनतेपर्यंत पोहचण्याचे काम सुरू आहे. युवक,महिला,शेतकरी, उद्योजक आदींचे प्रश्नही यानिमित्ताने समजावून घेत त्याच्या सोडवणुकीवर प्रयत्न केले जात आहेत. या अभियानात पोम्प्लेटवर केवळ मोदी यांचाच फोटो आहे. मी खासदार असलो तरी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. लोकसभेसाठी उमेदवार कोण त्याच्याशी आम्हांला काही घेणं नाही असं स्पष्टपणे खासदार सुजय विखे म्हणाले.
राज्यात त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात ज्याही काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत त्या जर पाहिल्या तर त्यामध्ये जरी राजकीय लोकं किंवा त्यांचे कार्यकर्ते दिसून येत असले तरी कुठेतरी हे प्रकार त्यांच्यातील असलेल्या वैयक्तिक भांडणातून झालेल्या असल्याचे दिसून येत आहे. व्यक्तिगत वाद,आपसापसात असलेल्या द्वेष त्या भावनेतून घडलेली हे सर्व प्रकार आहेत. मात्र असे असले तरीही सरकार आणि पोलीस अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निश्चितच कार्यवाही करतील. ज्या घटना घडत आहेत त्या आवरणं आणि त्यावर वेळेवर निर्बंध कसे आणता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आपल्या पद्धतीने काम करत आहेत जे काही यंत्रणा आहेत त्यात सुधारणा करण्याची गरज असेल त्यानुसार ती होईल असा विश्वास खा.विखे यांनी व्यक्त केला.