सोनईच्या सभेत उद्धव ठाकरेंची गर्जना
नगर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी अबकी बार 400 पारची भाषा करत असले तरी त्यांना 40 जागा तरी निवडून येणार आहेत का हा विषय आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष निवडणुकीला किती घाबरलेला आहे ते स्पष्ट होत आहे, कारण एकीकडे चारसौ पारची भाषा करायची आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्ष फोडायचे, वेगवेगळ्या पक्षांचे नेते फोडायचे. ज्या नेत्यांवर नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्वेतपत्रिका काढत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत आरोप केले. पंतप्रधान मोदींनी सिंचन घोटाळ्यात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा जाहीर आरोप केला, अशा नेत्यांना भाजपा पक्षात समावेश करत आहे. यावरूनच यांचा चारसौ पारचा नारा पोकळ असल्याची टीका शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नगर जिल्ह्यात आले असून जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जनसंवाद सभा होत आहेत. आज दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी नेवासा विधान मतदार संघातील सोनई येथे जनसंवाद सभा घेतली. यावेळी आमदार माजी मंत्री आमदार शंकराव गडाख, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर संपर्कप्रमुख आ.दिलीप शिंदे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचा खरपूस समाचार घेतला. ज्या पक्षाने यांना दोनदा मुख्यमंत्री बनवले. अनेक पदे दिले मात्र तेच नेते आता कुठेतरी भाजप आणि ईडीच्या दबावांमध्ये पक्षांतर करत आहेत. आमचाही पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला. पक्षाची नावे चिन्ह यांनी चोरली आणि त्यानंतर आता आबकी बार चारसौ पारचा नारा देत असले तरी भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे. आणि त्यामुळेच नेत्यांवर दबाव आणून पक्षांतर घडवून आणले जात आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधीही दिल्लीच्या तक्ता समोर झुकणार नाहीत. नेते गेले असतील पण महाराष्ट्र दिल्लीच्या तक्तासमोर झुकणार नाही असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाड्यात सध्या अवकाळी पाऊस होत आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न समोर आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय. अशा वेळेस अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी केवळ स्वतःच्या कुटुंबाचं हित पहात भाजपला स्वाधीन केलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. गद्दारांना खोके मिळेल राज्यसभा मिळेल आतापर्यंतची भ्रष्ट कारकीर्द त्यांची धुतली जाईल मात्र दुसरीकडे वर्षानुवर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बीजेपीचे काम करणाऱ्या निष्ठावंत उपरेच राहणार आहेत का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. भाजप पायी शिवसेनेचे 25 वर्ष वाया गेले मात्र यापुढे नतद्रष्ट भाजपची पालखी शिवसेना कधीही वाहणार नाही आम्ही आता तुमच्या पालखीचे भोई होणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अशोक चव्हाण जरी ईडीच्या भीतीने आज भाजपात गेले असले तरी भविष्यात येणार सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय असू शकणार नाही आणि त्यावेळेस आम्ही अशा गद्दारांना त्यांची चौकशी करू असा इशारा दिला.
यावेळी आपल्या भाषणात आमदार शंकराव गडाख यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मी अपक्ष निवडून आलेलो असताना शिवसेनेत दाखल झालो आणि मला पक्षाने मंत्री केले. या माध्यमातून मी मतदार संघासाठी अनेक कामे करू शकलो यापुढेही आपण शिवसेने सोबतच कायम असु आणि महाविकास आघाडीचे एक निष्ठेने काम करू अशी ग्वाही गडाख यांनी दिली.




