नगर:
शिवसेनेतील उभ्या फुटी नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही म्हंटले तरी काहीशी खिळखिळी झाली. चाळीसवर आमदार आणि बारावर खासदार शिंदे गटात सहभागी होत सत्तेत गेले. पक्षाचे शिवसेना नाव गेले, धनुष्यबाण चिन्ह गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासह आणि मशाल चिन्ह घेत नव्याने पक्ष उभारणीचे आव्हान होते. मात्र एकूणच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बाळकडू घेऊन मोठे झालेले उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेची सुरू ठेवलेली पुनर्बांधणी वाखाणण्याजोगी आहे.
सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत असून कोकण,मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात त्यांच्या सभा पार पडत आहेत. या सभांना ठाकरेंना जनतेतून चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे ठाकरेंच्या भाषणाची धार अजूनच वाढलेली आहे. नगर जिल्हा दौऱ्यात उद्धव ठाकरे 13 आणि 14 फेब्रुवारी असे दोन दिवस सहा जनसंवाद सभा घेत आहेत. अनेक ठिकाणी वाटेवर त्यांचे मोठे जंगी स्वागत होत आहे. या वातावरणामुळे नगर जिल्ह्यातील शिवसेनेत एक नवा उत्साह वाढला आहे. त्याच बरोबर मविआ मधील राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातही ठाकरेंच्या सभामुळे वातावरण निर्मिती होत असल्याने समाधान दिसून येत आहे. लोकसभे पाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांच्या वातावरणनिर्मिती साठी उद्धव ठाकरेंचा दौरा ताकत देणारा ठरणारा आहे.
मूळ मुद्दा सध्या जागावाटपाचा आहे आणि तो सत्तेतील महायुती बरोबरच विरोधात असलेल्या महाविकास आघाडीत अजून सुटलेला नाही. वरवर दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते सर्व आलबेल असे दाखवत असले तरी आतून जागावाटपात अनेक अडथळ्याच्या शर्यती सुरू आहेत. दोन्ही बाजूनं किमान चार-चार पक्षांचे अंतिम समाधान होणे अशक्य असल्याने केवळ चर्चेच्या फेऱ्यात जागावाटप अडकले आहे. वंचितची चर्चा महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर सुरू आहे. तिकडे महायुती मध्ये आठवले गट पण दोन जागांची मागणी करत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. या मतदारसंघावर मूळ दावा शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्या आघाडी-महायुती मध्ये आहे. त्यात आता वंचितच्या समावेशाने तसेच आठवलेंच्या शिर्डीच्या जागेच्या मागणीने जागावाटपा बरोबरच उमेदवार घोषणेचे घोंगडे भिजत पडले आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात तब्बल सहा जनसभा होत असल्याने ठाकरे शिर्डीचा दावा कदापि सोडणार नाहीत हे स्पष्ट आहे. विषय उमेदवार कोण हा आता आहे.
माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश झाल्यानंतर त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. ठाकरेंच्या दौऱ्यात वाकचौरे सावलीसारखे ठाकरेंच्या सोबत व्यासपीठावर आहेत. मात्र दौऱ्याच्या पहिल्या दिवशी तरी उद्धव ठाकरे वाकचौरेंचे उमेदवार म्हणून नाव घेणे टाळत असून तसे संकेतही देताना दिसून येत नाहीत. यावर आता कुजबुज सुरू असली तरी आघाडीचा धर्म म्हणून अजून जागा वाटप घोषित झाले नसल्याने त्यांनी जाणीवपूर्वक नाव घेणे टाळले असावे असे बोलले जात आहे.
काल राहुरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आ.प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने बाजार समिती समोर जोरदार स्वागत झाले. इथे ठाकरे यांनी छोटेखानी भाषणही केले. या भाषणादरम्यान ठाकरे यांनी बोलताना लोकसभा आणि विधानसभेला आपल्याला समर्थपणे सामोरे जायचे असल्याचे सांगितले. हे सांगत असताना”विधानसभा तर ठरलेलीच आहे” हे वाक्य म्हणताना त्यांनी आ.प्राजक्त तनपुरे यांच्या कडे हात करत एक प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार कोण हे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकसभे बाबत बोलताना त्यांनी “लोकसभेतही आपल्या हक्काचा खासदार, जो तुमचा आवाज दिल्लीत उठवेल असा खासदार पुन्हा पाठवायचा आहे” असे म्हंटले, मात्र यावेळी त्यांनी कोणताही इशारा केला नाही. गमतीचा भाग म्हणजे ठाकरे लोकसभेचा उल्लेख करत असताना आ.प्राजक्त तनपुरे हे शेजारीच उभ्या असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना हाताने पुढे सरकवत सूचक संकेत देण्याच्या प्रयत्नात होते. मात्र वाकचौरे हे काही जागचे हलले नाहीत. आ.तनपुरे यांच्या कडून सहज झालेली ही तात्कालिक कृती जाणकारांच्या नजरेतून सुटली नाही. एकूणच उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे रणशिंग शिर्डी साठी फुंकले असले तरी भाऊसाहेब वाकचौरेंच्या उमेदवारीबाबत नावाचे साधे संकेतही का दिले नाही अशी चर्चा होत आहे.
दरम्यान ठाकरे गटाकडून लोकसभे साठी इच्छुक असलेले माजीमंत्री बबनराव घोलप हे पण ऍक्टिव्ह मोडवर आलेले दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटी चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच घोलप यांनी चर्मकार समाजाच्या काही मुद्यांवर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. याचे फोटो समाज माध्यमातून चांगलेच व्हायरल होत आहेत. घोलप यांचे हे एकप्रकारे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाकडून शिर्डी साठी उमेदवारी न मिळाल्यास घोलप शिंदे गटात जात उमेदवारी करू शकतात असेही बोलले जात आहे. असे झाल्यास विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे काय असाही प्रश्न आहे. एकूणच शिर्डीची जागा शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गटच लढवणार अशी सध्याची स्थिती असली तरी उमेदवार कोण हे दोन्ही बाजूंनी काहीसे गुलदस्त्यातच ठेवणे पसंत केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे वाकचौरेंना सोबत घेत शिर्डी मतदारसंघात लोकसभेचे रणशिंग फुंकत असले तरी स्पष्टपणे उमेदवार म्हणून वाकचौरेंचे “प्रमोशन” करण्याचे टाळताना दिसून येत आहेत.

