नगर:
शिवसेना नेत्या आणि शिवसेना महिला आघाडीच्या बुलंद तोफ समजल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे सध्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेनिमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्यात गाठीभेठी घेत आहेत. याच अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपासून सुषमा अंधारे नगर जिल्ह्यात आलेले असून ठीक ठिकाणी त्या समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. आज नगरमध्ये त्यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी अहमदनगर वकील संघटनेशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात त्या आल्या असता त्यांना या ठिकाणी मनसे पदाधिकारी एडवोकेट अनिता दिघे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी प्रचंड विरोध केला.
सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांविषयी अनेकदा वादग्रस्त विधाने करत हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याआहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने जिल्हा न्यायालयातून तसेच नगर शहर आणि जिल्ह्यातून बाहेर जावे अशी मागणी करत एकच गोंधळ घातला. यावेळी सुषमा अंधारे यांच्यासोबत शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा न्यायालयात नेहमीच मोठी गर्दी असते अशा वेळेस सुषमा अंधारे या वकिलांना भेटण्यासाठी येत असताना अनिता दिघे आणि स्मिता अष्टेकर यांनी अंधारे यांना जोरदारपणे विरोध करत मोठा आरडा ओरडा केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. मात्र विरोध करणाऱ्या महिला कार्यकर्त्या ऐकण्यास अजिबात तयार नव्हत्या. अंधारे यांनी ताबडतोब न्यायालयासह जिल्ह्याच्या बाहेर जावे अशी त्यांची मागणी होती. यावेळेस शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या स्मिता अष्टीकर यांनी तर पायातील चप्पल काढून फेकण्याचा प्रयत्नत दिसून आल्या. मात्र महिला पोलिसांनी त्यांना आवरले. यावेळी अंधारेंनी उपस्थित असलेल्या काही वकिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी न्यायालयातून काढता पाय घेतला.
आजच्या घटने बाबत बोलताना ऍड.अनिता दिघे आणि स्मिता अष्टेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सुषमा अंधारे यांनी अनेकदा हिंदू धर्मातील देव देवतांबद्दल खूपच खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. नको अशी त्यांची वक्तव्य समाज माध्यमात दिसून येतात. त्यामुळे अशा व्यक्तीला आमचा विरोध आहे. त्यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मी बाळासाहेब ठाकरे यांची कडवट शिवसैनिक असून हिंदू धर्माच्या विरोधात काहीही ऐकून घेऊ शकत नाही अशी भूमिका मांडली.
याबाबत सुषमा अंधारे यांनी माध्यमंशी बोलताना मी सध्या मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर फिरत असून समाजातील शेतकरी कामगार युवक महिला वकील व्यावसायिक उद्योजक अशा विविध घटकांशी संवाद साधत चर्चा करत आहे. यामधून सरकार बद्दल असलेली चीड दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हा न्यायालयात वकिलांशी चर्चा करून त्यांना अपेक्षित असलेला वकील सुरक्षा कायदा याबाबत चर्चा करण्याकरता मी आले होते. झालेल्या गोंधळा बाबत आणि विरोधाबाबत ,असे काही मोठे इथे झालेले नाही सांगत याचा कसलाही परिणाम माझ्या मुक्त संवाद यात्रेवर होणार नसून या ठिकाणी काहीही झाले नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आज जिल्हा न्यायालयात झालेल्या प्रकाराची मोठी चर्चा होत असून सुषमा अंधारे या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या असतानाच ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने त्यांना विरोध केल्याने मोठी चर्चा दिसून येत होती.

