शेवगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग..
शेवगाव(प्रतिनिधी):
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते अशी परस्थिती असताना राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपने कालच 16 राज्यातील आपले 196 उमेदवार घोषित केले असले तरी त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही. अर्थात मविआ प्रमाणेच महायुती मधेही तिन्ही पक्षात जागावाटपा वरून रस्सीखेच सुरू असल्याने उमेदवारांच्या घोषणेसाठी विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. अशात नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेतून भाजपचा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण याचीही उत्सुकता वाढली आहे. या परस्थितीत भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांनी विविध कार्यक्रमातून प्रचाराचा एक प्रकारे धडाका अगोदरच सुरू केलेला आहे. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी एका बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर “में हु डॉन..” या हिंदी गाण्यावर थिरकत डान्स केल्याने त्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून चांगलाच चर्चेत आला आहे.
अरे दिवानो, मुझे पहचानो..में हूं डॉन!! असे या गाण्याचे बोल असल्याने, एक प्रकारे खा. विखे यांनी या गाण्यावर थिरकत केलेला डान्स पाहता सध्या सुरू असलेल्या उमेदवारी वरून सुरू असलेल्या खेचाखेचीत इच्छुकांना आणि विरोधकांना इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप कडून आ.राम शिंदे यांनी तसेच भाजप प्रदेशचे पदाधिकारी प्रा.भानुदास बेरड इच्छुक आहेत. तशी अपेक्षा वा मागणी त्यांनी पक्षाकडे केलेली आहे. तर आ.निलेश लंके यांच्या चर्चेतल्या “उमेदवारी”चे वादळाने जोर पकडला असताना नगर दक्षिणेतील भाजप कडून कोण तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण या बाबत मोठी उत्कंठावर्धक परस्थिती निर्माण झाली आहे. अशात काही महिन्यापासूनच उमेदवारी आणि प्रचाराच्या मोडवर असलेले खा.सुजय विखे यांनी “अरे ‘दिवानो’ मुझे पहचानो.. में हु ‘डॉन’..” या गाण्यावर केलेला डान्स सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे.
काल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उत्सवमूर्ती महिला भगिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित असंख्य महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामधे महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अनेक महिला या आकर्षक बक्षिसांच्या मानकरी देखील ठरल्या. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने उपस्थितांची मने जिंकली. तसेच अभिनेत्री मानसी नाईकने देखील आपल्या नृत्यातून प्रेक्षकांवर भुरळ घातली. यासोबतच महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल, रोहित माने आणि शिवाजी परब यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांच्या मनात स्थान निर्माण केले.
अतिशय मनोरंजनात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील ‘मै हु डॉन..’ या गाण्यावर ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.
सदरील कार्यक्रमात कोरोना काळात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. विजया फळके, कृषी खात्यातील अधिकारी या नात्याने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सविता सानप, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणाऱ्या उषाताई होळकर, झाडू कामगार असूनही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या पवित्राबाई कुसळकर, शिक्षणाप्रती समाजजागृती करणाऱ्या कमरूनिसा सालार शेख, समाजसेवेसाठी नेहमी पुढे असणाऱ्या शामा गांधी, प्रामाणिकपणे एसटी बस वाहक म्हणून सेवा देणाऱ्या सुवर्णा देवकाते, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविणाऱ्या सुवर्णा टाकळकर, अश्विनी काकडे आणि रूपाली सरोदे, पार्लरचा व्यवसाय करून यामध्ये महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या सीमा लाहोटी, समुदाय संसाधन व्यक्ती (ICRP) म्हणून असंख्य महिलांना सीआयएफ (CIF) निधी उपलब्ध करून देणाऱ्या सविता भुजबळ, अश्विनी काकडे आणि सुवर्णा टाकळकर आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

