नगर:
संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आता लागली आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित होऊन आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागणार आहे. अशात नगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तर सध्या निवडणूक प्रचारपूर्व धूम राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षकडूनच नव्हे तर संभाव्य लढतीमधील उमेदवार असू शकणारे विद्यमान भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.निलेश लंके हे दोघेही आपणच उमेदवारी करणार याबद्दल स्पष्ट बोलत नाहीत. मात्र असे असले तरी विखे आणि लंके यांच्याकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून दोघांनीही आयोजित केलेले अतिभव्य-दिव्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमांना जमलेली वा जमवली जाणारी गर्दी याचेच द्योतक म्हणावे लागेल.
आ.लंके अडीच वर्षापासूनच तयारीत!!
-राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आ.निलेश लंके यांची लोकसभेची तयारी जवळपास अडीच वर्षापासूनच सुरू झालेली होती. पक्षाकडून तसे त्यांना तयारी करण्यासही सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अडीच वर्षांपूर्वीच लंकेंच्या उमेदवारीचे सूतोवाच केले होते. त्यामुळे आ. निलेश लंके यांनी त्यादृष्टीने तयारीला लागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता. दरम्यान मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस युती सरकारमध्ये जवळपास 40 आमदारांना सोबत घेत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले.
लंके दांपत्यातुन कोण लढतीत उतरणार??
-अजित पवार यांच्या सोबत आ.निलेश लंके यांनी जाणे पसंत केले. याबाबत आ.लंके यांनी आई आणि वडिलां मध्ये एकाची निवड कशी करता येऊ शकते अशी भावनिक अगतिकता व्यक्त केली होती. पवार कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाल्याने त्यांना निर्णय घेणे अवघड झाले होते तसेच लंके यांचे मन शरद पवार यांच्याशी अधिक घट्ट असल्याचे बोलले जात होते. मात्र
मतदारसंघात विकास कामांसाठी अजित पवार यांच्यासोबत जाणे लंकेंनी पसंत केले, तसे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. या परस्थितीत आ.लंके लोकसभा लढवणार का?असा प्रश्न उपस्थित झाला कारण महायुती मध्ये नगर दक्षिणेची जागा भाजप कडे होती. मात्र काही काळातच आ.लंके यांनी पत्नी राणी लंके यांना मैदानात उतरवत त्यांच्या तोंडून लंके कुटुंब लोकसभा लढवणारच याचे स्पष्ट संकेत दिले होते.
लंके “घड्याळ” सोडत “तुतारी” हातात पकडणार??
-लंके लोकसभा लढवणारच अशी परिस्थिती असेल तर त्यांना महायुती ऐवजी महाविकास आघाडी कडून लढावे लागणार आणि मविआ मध्ये ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असल्याने लंके अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांची साथ पकडणार यावर चर्चा सुरू झाली होती. आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अगोदर राणी लंके यांची शिवस्वराज्य यात्रा आणि आता निलेश लंके प्रतिष्ठाणने आयोजित केलेले “शिवपुत्र संभाजी” महानाट्याचे आयोजन म्हणजे लंके दांपत्याने लोकसभेची तयारी अंतिम केल्याचे स्पष्ट असून उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
आ.लंकेंना कुणाकुनाची रसद??
-“शिवपुत्र संभाजी” महानाट्याचे आयोजनाच्या निमित्ताने आ.लंकेच्या “प्रेमा”पोटी मविआच्या जिल्ह्यातील अनेक नेते-पदाधिकार्यांची आणि विखे परिवारावर नाराज असलेले भाजप मधील आ.राम शिंदे, विवेक कोल्हे यांची उपस्थिती आणि त्यांनी आ.लंकेंना दिलेला “आशीर्वाद”पर वक्तव्ये पाहता लंके यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनची उमेदवारी जाहीर होणे यात केवळ औपचारिकता बाकी राहिल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ देतील तो आदेश पाळू असे सतत म्हणणारे आ.निलेश लंके यांचे “वरिष्ठ” नेमके कोण हे आता येत्या दोन-पाच दिवसांत स्पष्ट होणार आहे. एकूणच लंके दांपत्या पैकी एक जण लोकसभेच्या आखाड्यात असणार असल्याचे एव्हाना स्पष्ट होत असताना भाजप कडून पुन्हा उमेदवारीच्या पूर्ण तयारीत असलेले खा.सुजय विखे पाटील यांनीही परस्थितीची जाणीव करून घेत त्यांची तयारी अजून वेगवान सुरू केल्याचे दिसून येत आहे.
2019 प्रमाणे विखे 2024 ला पण साहेबांच्या आव्हानावर मात करणार!!
-2019 ला लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतरही काँग्रेस पक्षात असलेले राधाकृष्ण विखे पाटील पुत्र डॉ.सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आग्रही आणि प्रयत्नांत होते. मात्र नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. आणि शरद पवार यांनी अखेर पर्यंत झुलवत ठेवत सुजय विखे यांना उमेदवारी दिली नाहीच. त्यामुळे विखे परिवाराने मोठा निर्णय घेत डॉ सुजय विखे यांना भाजप मध्ये पाठवत लोकसभेची उमेदवारी पदरात पाडून घेतली. विरोधीपक्ष नेते असलेले राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस पक्षात राहत जवळपास उघडपणे सुजय विखे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ताकत पणाला लावली. याचाच परिणाम होत शरद पवारांनी पक्षाचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्यासाठी मोठी ताकत लावूनही पवार संग्राम जगताप यांना विजयी करू शकले नाही. सुजय विखे यांनी जवळपास पावणे तीन लाख मतांनी दणदणीत विजय त्यावेळी मिळवला.
सुजय विखें समोर विरोधकां सोबतच “स्वकीयां”चे आव्हान!!
-गेल्या पाच वर्षांच्या खासदारकीच्या काळात राज्यात आणि मतदारसंघातही अनेक घडामोडी घडल्या आहेत. विखे यांना एकीकडे आ.लंके यांच्याकडून आव्हान निर्माण केले जात असतानाच भाजप मधूनही खा.विखे यांच्या समोर भाजपच्या निष्ठावान म्हणणाऱ्या गटाने आव्हान निर्माण केले आहे. आ.राम शिंदे यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढऊ असे अनेकदा जाहीर स्पष्टपणे सांगितले आहे. 2019 च्या झालेल्या आपल्या पराभवाला राम शिंदे यांनी विखे कारणीभूत असल्याची तक्रार पक्षाकडे केल्याचे बोलले जाते. अशीच तक्रार कोपरगावच्या कोल्हे परिवाराची पण आहे. जोडीला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचीही रसद विखे विरोधी गटाला आहेच हे गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आले आहे.
या कारणांनी सुजय विखेंची उमेदवारी असेल निश्चित?
-या परस्थितीत खा.सुजय विखेंच्या समोरचे आव्हान अगोदर लोकसभेची उमेदवारी मिळवणे हे आहे. भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची अजून घोषणा केलेली नसली तरी सुजय विखे यांची उमेदवारी अंतिम असणार असे बोलले जात आहे. सुजय विखे यांना पक्षातून काहींचा विरोध असला तरी निवडून येण्याच्या गुणवत्तेतवर सुजय विखे हे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तसेच साईबाबांच्या शिर्डीत अनेक कार्यक्रम आणि विविध मुद्यांच्या निमित्ताने दिल्लीत विखे परिवाराच्या भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी असलेली जवळीक ही विखेंसाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच लोकसभेची उमेदवारी गृहीत मानून सुजय विखे यांनी दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मतदारसंघात गेल्या वर्षभरापासूनच जय्यत तयारी केली आहे.
प्रचारात सुजय विखेंची आघाडी..साखर करणार विखेंचा विजय गोड?
-गेल्या वर्षं अखेर साखर-शिदा वाटपाचा निमित्ताने सुजय विखे यांनी संपूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. एक प्रकारे उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्याचे म्हणावे लागेल. सध्या खा.विखे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध तालुक्यात भव्यदिव्य कार्यक्रम घेत असून यात महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करत बक्षिसांची लयलूट केली जात आहे. एकीकडे आ.लंके यांनी आयोजित केलेल्या “शिवपुत्र संभाजी” महानाट्या प्रयोग धडाक्यात सुरू असताना खा.विखे यांनी तालुक्या-तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य कार्यक्रम आयोजित करत “में हु डॉन” या गाण्यावर धूम उडवून दिली आहे. 2019 ला लोकसभेला शरद पवारांचे आव्हान पेलवत संग्राम जगताप यांच्यावर मात करत सुजय विखेंनी मिळवलेला दणदणीत विजय तसेच विधानसभेला निलेश लंके यांनी दिग्गज विजय औटी यांच्यावर मिळवलेला नेत्रदीपक विजय पाहता विखे-लंके या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपली सिद्धता दाखवलेली आहे. आता हेच दोन्ही नेते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2024 आमनेसामने येणार असेच जवळपास दिसून येत असल्याने
नागरिकांत 2024 ला नगर दक्षिणेचा कोण “डॉन” होणार आणि कोण बाजी मारत “बाजीगर” होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.