डॉ.जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड.. संगमनेरमध्ये युवापर्वाची सुरुवात.. निलेश थोरात यांना जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी
संगमनेर( प्रतिनिधी ):
कॅन्सर तज्ञ आणि युवानेत्या डॉ. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक कॉंग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली.
डॉ.जयश्री थोरात या सुपरीचित कॅन्सर तज्ज्ञ असून, त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच त्यांनी कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. आज त्या कॅन्सर रुग्णांना टाटा हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल येथे योग्य उपचारांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात.
ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉ. जयश्री यांच्या लक्षात आले की जनजागृती अभावी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला अनेक महिला बळी पडत आहे. या गंभीर प्रश्नावर व्यापक काम करण्याच्या हेतूने त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशन ची स्थापना केली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना मार्गदर्शन, सायकल वाटप, शालेय साहित्याचे वितरण, क्रीडा स्पर्धा, गुणदर्शन कार्यक्रम आदी माध्यमातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम उभे केले आहे. सामाजिक कार्यासोबतच लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मदतरूप भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली.
युवा संवाद या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील 153 गावातील प्रमुख युवक कार्यकर्त्यांच्या, दीडशेहून अधिक बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला. युवासंवाद च्या माध्यमातून समोर आलेल्या बहुतांश प्रश्नांची यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सोडवणूक केली. त्या वेळीच युवकांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेस अध्यक्षपद स्विकारण्याचा आग्रह केला होता, त्यानंतर डॉ. जयश्री या युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या होत्या.
डॉ. जयश्री यांनी कार्यकर्ता बनून संघटनेचे काम करण्याला प्राधान्य दिले ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या रूपाने युवक काँग्रेसला अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सेवाभावी चेहरा मिळाला असल्याची भावना, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष निलेश थोरात यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून, संगमनेर सारख्या व्यापक तालुक्यात काम करण्याचा निलेश थोरात यांचा अनुभव जिल्ह्याच्या युवक काँग्रेसला नक्की उपयोगी पडेल असा आशावाद, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी व्यक्त केला.
युवक कार्यकर्त्यांचा आग्रह..
-डॉ. जयश्री थोरात यांची सेवाभावी वृत्ती आणि प्रश्न सोडवण्याची हातोटी यामुळे प्रभावित झालेल्या युवक कार्यकर्त्यांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद स्वीकारण्याची गळ घातली. यापूर्वी युवक काँग्रेसने घेतलेल्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, तेव्हापासूनच त्या काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रिय झाल्या होत्या. डॉ. जयश्री यांच्या निवडीने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार
-काँग्रेसचा विचार हा माझ्या कुटुंबात गेल्या शंभर वर्षांपासून रुजलेला आहे. राजकारणात सत्ता आल्या आणि गेल्या मात्र माझे वडील लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम काँग्रेस विचारांशी बांधिल राहिले. काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे आणि तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे, ही बांधिलकी त्यांनी माझ्यातही रुजवली आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मला मिळालेली आहे, शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील.संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे आभार मानते.
-डॉ.जयश्री थोरात