नगर:
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली नसली आणि तारखा घोषित होऊन किमान उमेदवारांच्या नावाची घोषणाही झाली नसली तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे सुसाट सुटले आहेत. विद्यमान भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची महायुतीकडून सिटिंग एमपी म्हणून उमेदवारी जवळपास अपेक्षित असली तरी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे महायुतीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात असलेले पारनेरचे आ.निलेश लंके दांपत्य लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मोडवर असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ टार्गेट ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र आ.लंकेनी पण अजून आपले पत्ते स्वतः ओपन केले नसले तरी त्यांनी पत्ते पिसलेले आहेत आणि ज्या पद्धतीने पत्ते पिसलेले आहेत ते पाहता निलेश लंके लवकरच मोठा धमाका करणार अशी परस्थिती आहे. त्यामुळे निवडणुका घोषित झालेल्या नसल्या आणि उमेदवारी जाहीर झाली अथवा केली नसली तरी जाणकार मतदारांनी होणारी लढत कशी अर्थात कोणत्या पक्षाकडून आणि कुणाकुनात होणार याचा व्होरा बांधलेला आहे. अधिकृत कोणी बोलत नसले तरी दोन्ही बाजूंनी निवडणुक लढवण्याचीच नव्हे तर प्रचाराचीच सुरुवात एव्हाना झाली आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि संभाव्य उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तर गेल्या वर्षभरापासून इलेक्शन मोड वर येत काम सुरू केले आहे. भारतीयांचा आणि हिंदू धर्मियांचा आस्थेचा विषय असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजप खा.विखे यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात साखर-डाळ-प्रसाद लाडू हे राबवलेले अभियान देशभर गाजले. मतदारसंघात गाव-वाडी-वस्ती पर्यंत ते तालुका-जिल्ह्याच्या शहरी भागात भाजप खा.विखे यांनी साखर-डाळ वाटपाचा उद्देश स्वतः सांगितला आणि मतदारसंघात “जय श्रीराम”चे वातावरण निर्माण केले.
दुसरी कडे आ.निलेश लंके यांची लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी विविध कार्यक्रमातून दिसून येत होती. राणी लंके यांची शिवस्वराज्य यात्रा निमित्ताने राणी लंके यांनी उघडपणे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणारच अशी गर्जना केली. पुढे आ.निलेश लंके यांनी याचा सोयीचा अर्थ प्रसार माध्यमांना सांगितला असला तरी जवळपास अडीच-तीन वर्षे लोकसभा निवडणूक लढवणाच्या तयारीत असलेले आ.लंके आता थांबतील अशी शक्यता मावळल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीस ते उपस्थित नसल्याची माहिती आहे. अशात पारनेर मधे येत्या दोन-पाच दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे आणि त्याची तयारी पूर्ण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कदाचित या कार्यक्रमात काही खोळंबलेल्या गोष्टी स्पष्ट होतील असेही बोलले जात आहे.
इकडे भाजप खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनीही मतदारसंघात तालुक्याच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच सुरू केली आहे. नगर शहरात निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित “शिवपुत्र संभाजी”महानाट्याचे प्रयोग सुरू असताना भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पाथर्डी,कर्जत-जामखेड आदी शहरात जागतिक महिला दिन आदींच्या निमित्ताने भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. तालुक्याच्या गावात झालेल्या या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुढील दोन-पाच दिवसांत नगर शहरात “मास्टर स्ट्रोक” मारण्याची तयारी पूर्ण केली आहे. एक भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून कला-नाट्य-सिने क्षेत्रातील राज्यातीलच नव्हे तर देश पातळीवर नावाजलेले अनेक चेहरे अर्थात सेलिब्रेटी नगर शहरात येणार असल्याचे समजते.