नगर (प्रतिनिधी):
चर्मकार समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून समाजाला प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे संजय खामकर यांना 2020-21 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा संत रविदास पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक न्याय विभाग व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवारी (दि.12 मार्च) रोजी नरिमन पॉर्इंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खामकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. चर्मकार समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला असून, शासनस्तरावर समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी त्यांचे कार्य सुरु आहे. राज्यातील लाखो समाजबांधवांना त्यांनी संघटित केले असून, गटई कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते कार्य करत आहे. वधू-वर परिचय मेळावे व रोजगार मेळावा घेवून युवकांना दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. शहरात संत रविदास महाराज विकास केंद्र उभारण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने त्यांना संत रविदास पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.